- राजु इनामदार
पुणे : कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीच्या पुढे जमिनीखाली २८ मीटर खोलीवरचा कातळ फोडून साडेसात मीटर व्यासाचे कटर असलेले टीबीएम दुपारी १२ वाजता बाहेर आले. यावेळी महामेट्रो तसेच ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. शिवाजीनगरकडून आलेले दोन व स्वारगेटकडून आलेले दोन अशा एकूण १२ किलोमीटरच्या चार बोगद्यांचे काम शनिवारी पूर्ण झाले. भुयारी स्थानकांचे काम सुरू असून, मार्च २०२३मध्ये ६ किलोमीटर अंतराचा हा शिवाजीनगर ते स्वारगेट असा भुयारी मार्ग वापरण्यास सुरूवात करता येईल.
मंडईपासून या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले होते. दुपारी बरोबर १२ वाजता साडेसात मीटर व्यासाचा कटर असलेले टीबीएम भला मोठा आवाज करत तेवढ्याच आकाराच्या गोलातला दगडी कातळ भेदत बाहेर आले. कटर पूर्ण बाहेर आल्यानंतर त्यातून कर्मचारी खाली उतरले. त्यावेळी बाहेरच्या कर्मचाऱ्यांनी ‘भारत माता की जय’ म्हणून हातात तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले. जमिनीखाली २८ मीटर खोलीवर हा स्वागत सोहळा रंगला.
मेट्रोच्या प्रकल्प विभागाचे संचालक अतुल गाडगीळ, जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी हे काम वेळेत व विनाअपघात पूर्ण झाल्याबद्दल मोबाईलवरून समाधान व्यक्त केले. लवकरच उन्नत मार्गाची कामे पूर्ण करून संपूर्ण मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कसबा पेठेत चार बोगदे झाले एकत्र
त्याआधी याच मार्गाने एक बोगदा कसबा पेठेत येऊन पोहोचला होता. शिवाजीनगरपासून सुरू होणारे दोन बोगदेही कसबा पेठेत आले होते. हा चौथा बोगदा आज पूर्ण झाला. कसबा पेठेत आता चार बोगदे एकत्र झाले आहेत. या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. भुयारी मार्गात एकूण ४ स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर, स्वारगेट या स्थानकांची कामे जोरात सुरू आहेत. मध्य भागातील सिव्हिल कोर्ट स्थानकाचे कामही जोरात सुरू आहे. मंडई व कसबा पेठ या स्थानकांचे काम मात्र रेंगाळले होते. बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने तेही आता पूर्ण होईल.