पिंपरी : भाजपचे भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नाच्या मांडव डहाळे कार्यक्रमात ठेका धरला. आमदार लांडगे नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यासह इतर ६० जणांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३१) गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, अजित सस्ते, कुंदन गायकवाड, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यासह इतर सुमारे ४० ते ५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सुरेश नानासो वाघमोडे (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आमदार महेश लांडगे हे भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निकटवर्तीयांना तसेच नातेवाईकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. यात काही जण दगावले. तसेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आमदार लांडगे यांनी सोशल मीडियातून हतबल होत दु:ख व्यक्त केले होते. तसेच शहरातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला होता. कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र नियम उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.