- किरण शिंदे
पुणे :पुणे जिल्ह्यातील मावळ परिसर, बैलगाडा प्रेमींनी मैदान खचाखच भरलं होतं. खंड्या आणि वजीर नेहमीप्रमाणे मैदान मारण्यासाठी सज्ज होते. सर्वांच्या नजरा बैलगाडीवर रोखल्या होत्या. शर्यत कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि झेंडा पडला. खंड्या आणि वजीर जिवाच्या आकांताने धावत होते. काही सेकंदातच या जोडीने शर्यत पूर्ण केली. खंड्या नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा घाटाचा राजा ठरला. बैलगाडा मालक आनंद साजरा करत होते आणि इतक्यात ती दुर्दैवी घटना घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने खंड्या कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पंचक्रोशीत मानसन्मान मिळवून देणाऱ्या खंडाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने जे केलं ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
बैलगाडा मालक राहुल जाधव यांनी आठ महिन्याचा असताना खंड्याला आणले होते. त्यानंतर पाच वर्ष त्याचा घरातील सदस्याप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण जाधव कुटुंबीयावर शोककळा पसरली होती. खंड्याला शेवटचा निरोप देताना जाधव कुटुंबीयांनी आपल्या घराशेजारीच त्याचा दफनविधी केला. त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. इतकच नाही तर घराशेजारीच खंड्या बैलाची समाधी उभारून त्याने केलेल्या उपकाराची परतफेड केली.
बैलगाडा शर्यतीत खंड्याने अनेक विक्रम केले होते. पुणे जिल्ह्यात ६५ हून अधिक शर्यती जिंकल्या होत्या. महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणूनही त्याने नावलौकिक मिळवला होता. आयुष्याची शेवटची शर्यतीतही तो राजाच ठरला. आपल्या मालकाचा नावलौकिक त्यानं शेवटच्या शर्यतीतही वाढवला. स्वतः मात्र मरणाच्या दारात गेला. मालकाने सुद्धा खंड्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशाच प्रकारे त्याला शेवटचा निरोप दिला.