पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल राजकीय मतभेद किंवा राजकीय भूमिकेतून भाजप नेते अनेकदा टीका करतात. मात्र, देशातील वरिष्ठ नेते आणि राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा नेहमीच आदर केला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मात्र, जेव्हा एकाच व्यासपीठावर ते असतात, तेव्हा शरद पवारांचा आदर करतात. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही तेच पाहायला मिळालं.
पुण्यातील सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गोपालकृष्ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, शैलेश पगारिया, संतसिंह मोखा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शरद पवारांची उपस्थिती आहे, म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटील धावत-पळत आले. विशेष म्हणजे हातीतील दोन कार्यक्रम लवकर संपवून मी आलो, असे चंद्रकांत पाटील यांनी स्वत:च शरद पवारांना सांगितले. त्यानंतर, दोन्ही हाताने पळतानाची नक्कलही करुन दाखवली. या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमापूर्वी गप्पाही मारल्या.
पवारांचा शिक्षणमंत्र्यांना सल्ला
देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र, फाळणीचा रक्तपाताचा इतिहास आणि कटूतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक, सांघिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील शैक्षणिक संस्थेत असे काम करावे असे सीबीएसई सांगत असेल तर समाजात विसंवाद वाढेल असे काम हाेणार नाही याची शिक्षण विभागाने काळजी घेत त्यांना कळवावे असा सल्लाही त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिला.