पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या खास भाषण शैलीसाठी आणि रोखठोक प्रतिक्रियेसाठी ओळखले जातात. त्यांच्या खास ग्रामीण भाषेतील कोपरखळ्यांनी भल्याभल्यांची दाणादाण उडते. बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितीत कार्यकर्त्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये सल्ला दिला. ज्याची दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
अजित पवार हे शनिवारी ( दि. २८) बारामती दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, सर्वांनी चांगलं शिक्षण घ्यावं. चांगलं राहावं.पण प्रत्येकाने आपापलं कुटुंब मर्यादित ठेवावं. उगीच पलटण वाढवत बसू नये.
५० वर्षांपूर्वी शरद पवार एका अपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की तुम्ही एका अपत्यावरच थांबा, पण दोन अपत्यावर थांबा आणि कुटुंब नियोजन करा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितीत नागरिकांना दिला. पवारांच्या अजब गजब सल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अरे, तुझा मास्क कुठंय, उचलायला सांगू का तुला पोलिसांना; अजित पवारांनी घेतली कॅमेरामनची 'शाळा'
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाषण म्हणजे अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची पाखरण असते. भाषणात बोलता-बोलता दादा अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे साहजिकच विनोद निर्माण होतो. तर कधी कधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. सहकार व पणन मंडळाच्या बारामती येथील शनिवारी (दि. २८) कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किलपणा दिसून आला.
कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूूचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय. तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला. ------