Video: भल्या पहाटे अजितदादांची पुण्यात मेट्रो सवारी; प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 09:57 AM2020-09-18T09:57:56+5:302020-09-18T09:58:45+5:30
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली, त्यासोबतच पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभारही अजितदादांकडे आहे.
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे. अजितदादांच्या दिवसाची सुरुवात लवकर होते, आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांचा जनता दरबार सकाळी ७ वाजता भरत असे, अजित पवारांच्या जनता दरबारासाठी सकाळी लोकांची रांग लागत होती. कोणत्याही नियोजित कार्यक्रमात अजित पवार वेळेआधीच पोहचत असतात ही त्यांची खासियत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली, त्यासोबतच पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभारही अजितदादांकडे आहे. सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका, विकासकामांची पाहणी अशा दिनक्रम अजित पवारांचा असतो, त्यामुळे अजित पवारांच्या दिवसाची सुरुवात पहाटेपासून होत असते. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा पुण्यात पाहायला मिळाला.
जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणेमेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजता पोहोचले होते. सहा वाजण्याच्या सुमारास शहरात येऊन पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. अजित पवार पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथे दाखल झाले होते. वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे अजित पवार ओळखले जातात. त्यामुळे अजित पवार येणार असल्याने मेट्रोचे अधिकारी आधीपासूनच कामाला लागले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी ६ वाजता घेतला पुणे मेट्रो कामाचा आढावा @AjitPawarSpeaks@CredaiPunemetropic.twitter.com/EoWvaP2pAA
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2020
अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रो संदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळाला. मेट्रोचे आढावा घेतल्यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. यावेळी अजित पवार हे मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.