पुणे : नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तुकडा खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र व्हिडीओतील कुत्र्याच्या तोंडात आणि परिसरात पडलेले मांसाचे तुकडे नसून मोठे पाव आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. येथील भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे. दरम्यान, याप्रकरणी दत्तवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून, संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
पुणे महापालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी, तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा, अशा एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. त्यामधील नवीपेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी परिसरात काही भटकी कुत्री जळालेल्या मृतदेहाच्या जवळ काही तरी खात होती. हा प्रकार पाहून घाबरलेल्या नागरिकांनी बारवकर यांना ही माहिती दिली, तसेच या कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर बारवकर यांनी या प्रकरणाची आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर हे मृतदेहाचे तुकडे नसून पाव असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.
वैकुंठ स्मशानभूमीवर सर्वाधिक ताण
'वैकुंठ स्मशानभूमीत शवदहनासाठी तीन विद्युत दाहिन्या, एक गॅस दाहिनी आणि लाकडावर अंत्यसंस्कारासाठी सहा वूड पायर पद्धतीच्या चार शेड कार्यान्वित आहेत. या दाहिन्या आणि चार शेडमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्वतंत्र स्क्रबर आणि ब्लोअर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या धुरावर प्रक्रिया करून तो ३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या चिमणीमधून हवेमध्ये सोडण्यात येतो. शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २८ स्मशानभूमी उभारण्यात आल्या आहेत. या स्मशानभूमी उभारणीमागचा उद्देशच शहरातील विविध भागांतील नागरिकांना त्या-त्या भागांत अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, हा होता. मात्र, शहरातील एकूण मृतदेहांपैकी ५७ टक्के मृतदेहांवर एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे लोकांचे प्राधान्य वैकुंठ स्मशानभूमीलाच असते. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवर सर्वाधिक ताण येत आहे.
आमच्याकडे केवळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि विद्युत दाहिनी चालू-बंद करणे एवढीच जबाबदारी आहे. इतर सर्व व्यवस्थापन क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. - मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका