केडगाव (पुणे) : यवत (ता- दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर एका दुचाकीने पादचाऱ्याला दिलेल्या धडकीमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे व एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी ( २० जून) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
यासंदर्भात सोमनाथ भाऊ मदने (वय ५५ वर्षे व्यवसाय - शेतमजुरी राहणार रा. दापोडी, दौंड जि. पुणे) यांनी यवत पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा मुलगा दादासाहेब मदने हा कामानिमित्त यवत येथे गेला होता. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दादासाहेब सोमनाथ मदने हा यवत गावातील जनसेवा मेडिकलचे समोर सोलापूर-पुणे हायवे रोड पार करून जात असताना त्यास पुणे बाजुकडून सोलापुर बाजुकडे जात असलेल्या एका काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकलची जोरात धडक बसून अपघात झाला.
अपघातात दादासाहेब मदने याला डोक्याला, तोंडाला, पायाला मार लागल्याने त्याला यवत गावातील सरकारी दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. तसेच बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल वरील प्रज्वल महेंद्र शेळके व विवेक विकास बारवकर (दोंन्ही रा.केडगांव ता.दौंड जि.पुणे) यांना डोक्यास, हाता पायास मार लागल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा प्रज्वल शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला.