पुणे :पुणे- मुंबई महामार्गावरून कोटींचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत २ हजार दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या मद्याची किंमत १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पकडलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दोन ट्रकमधून ही दारू गोव्यातून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात असताना ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातील आरोपींनी पोलिसांना संशय येऊ नये यासाठी या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या. मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तर वास येण्याची शक्यता असते त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये या हेतूने हा शक्कल लढवली होती. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे मद्य बनावट आहे. गोवा राज्यातून हा माल आल्याचे समोर आले आहे. पण कुठे जात होता याचा शोध सुरू आहे.
- चरणसिंग रजपूत (पोलिस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग)