पुणे: कोणतेही राजकारण न आणता पुण्याला देशातील सर्वोत्तम, सुरक्षित शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचा हा ट्रायल रन पुण्याचे स्वप्न पुर्ण करणारा ठरेल अशी ग्वाही ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या वनाज ते आनंदनगर या अंतराची चाचणी आज पवार यांच्या प्रमुख ऊपस्थितीत झाली. विधानपरिषदेच्या ऊपसभापती डॉ. निलम गोर्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, प्रकल्प संचालक प्रकल्प अतूल गाडगीळ यावेळी ऊपस्थित होते.
पवार म्हणाले, सरकार कोणाचे आहे हे जनता ठरवते. निवडणूकीनंतर विकास महत्वाचा या विचाराने सगळे एकत्र येऊन काम करतो आहोत. पुण्याला काहीही कमी पडू देणार नाही. अनेक प्रकारची विकासकामे भविष्यात प्रस्तावित केली आहेत. ७५ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील द्रुकश्राव्य माध्यमातून सहभागी होते. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्प सुरू झाला. कोरोनामुळे खीळ बसेल असे वाटले होते, मात्र मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा ठेवला. अधिकारी, कर्मचारी यांंनी अडथळे दूर करत काम केले. महापौर मोहोळ म्हणाले, राज्यातील सर्वात मोठी महापालिका पुणे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचा मोठा वाटा असेल. पुण्याला ही संधी मिळवून देण्यात सर्वांचाच सहभाग आहे.
गोऱ्हे म्हणाल्या, जमीनीवरून की भूयारी या वादात अडकलेली मेट्रो पुण्यात अखेर सुरु झाली. पुण्यातील विलंबाची कसर या कामातून भरून निघाली. महिलांसाठी मेट्रो खास सुरक्षित सेवा आहे. दीक्षित यांनी प्रास्तविक केले. पुण्यातील पहिल्या ३ किलोमीटरची चाचणी घेताना अभिमान वाटतो असे ते म्हणाले. ३ वर्षात काम पुर्ण झाले. त्यातले एक वर्षे कोरोनातच गेले. मेट्रो कामाचा त्रास सहन करत असल्याबद्दल दीक्षित यांनी पुणेकरांना धन्यवाद दिले. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थानिक नगरसेवक अर्पणा वरपे, वैशाली माथवड ऊपस्थित होते. योगेश देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले. संचालक अतूल गाडगीळ यांनी आभार व्यक्त केले. मेट्रोच्या कामाची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आली.
पुणे मेट्रोची वैशिष्ट्येभारतीय बनावटीचे अँल्यूम्यूनियम कोच. भारतात प्रथमच पुण्यात वापर३ कोचमध्ये ९५० पेक्षा जास्त प्रवासीपँनिक बटण ची खास व्यवस्थामहिलांसाठी विशेष बोगीअपंगांना व्हील चेअर
नियमांचे पालन व्हायला हवे. आमच्यावर नाही, पण संयोजकांवर गुन्हे दाखल होतात. दीक्षितांवर गून्हा नको दाखल व्हायला, म्हणून काळजी घेतली. सकाळी कार्यक्रम का असा प्रश्न पडेल. मेट्रोच्या कामाचा त्रास पुणेकरांना होतच आहे. आणखी त्रास नको म्हणून सकाळी घेतला कार्यक्रम असं अजित पवार म्हणाले.