माळेगाव : माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर त्यांना दुधाने दुग्धभिषेक घालत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर 'व्हायरल' होत आहे.
माळेगाव येथे ३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक देखील केली होती. तसेच बारामती पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास करून मोक्का अंतर्गंत कारवाई केल्याची ही पहिलीच कारवाई होती. मात्र, काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी याप्रकरणी माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक केली होती.
राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांच्या अटकेच्या विरोधात माळेगाव येथे जनता रस्त्यावर उतरली होती.यावेळी तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगांव येथे पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
मात्र, पोलिसांनी मोक्का न्यायालयात सदर गोळीबारच्या गुन्ह्यात जयदीप तावरे यांचा हात नसल्याप्रकरणी युक्तिवाद कोर्टात केल्याने तावरे यांची सध्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना दुधाने अंघोळ घालत आनंद व्यक्त केला.