अजित पवारांचे विश्वासू बाबुराव चांदेरेंच्या दादागिरीचे व्हिडिओ व्हायरल; कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:45 IST2025-01-28T11:45:05+5:302025-01-28T11:45:52+5:30
बाबुराव चांदेरेंची मारहाणीची पहिली वेळ नाही. २०२४ च्या जुलै महिन्यात बाणेरमध्ये...

अजित पवारांचे विश्वासू बाबुराव चांदेरेंच्या दादागिरीचे व्हिडिओ व्हायरल; कारवाईची मागणी
- किरण शिंदे
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू आणि पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे मारहाण आणि दादागिरीचे व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत चांदेरे एका बांधकाम व्यावसायिकाला उचलून रस्त्यावर आदळताना दिसत आहेत. ड्रेनेज लाईन टाकण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.
दुसऱ्या प्रकरणातही मारहाण
ही बाबुराव चांदेरेंची मारहाणीची पहिली वेळ नाही. २०२४ च्या जुलै महिन्यात बाणेरमध्ये त्यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली होती. वाहतुकीस अडथळा ठरल्याचा आरोप करत त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणातही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
तिसऱ्या व्हिडिओतही दमदाटीचा प्रकार
अलीकडील आणखी एका व्हिडिओत बाणेर परिसरातील खाऊ गल्लीत चांदेरे स्थानिकांना धमकावताना आणि एका वाहनचालकाला दमदाटी करताना दिसले. या सर्व घटना पाहता, चांदेरेंच्या दादागिरीचे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चांदेरेंना याबद्दल जाब विचारला जाईल. असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची कारवाई महत्त्वाची बाबुराव चांदेरेंवर आता पक्ष स्तरावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनांमुळे चांदेरेंची प्रतिमा आणि पक्षाची शिस्त या दोन्हींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.