इंदापूर (पुणे) : शिवशाही बसला लागलेली आग चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने विझवण्यात यश मिळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढेवस्तीच्या हद्दीत बुधवारी (दि.१७) सकाळी पावणेदहा वाजता हा प्रकार घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चालक शिवाजी तुळजाराम पऊळ हे आपल्या ताब्यातील तुळजापूर-पुणे ही शिवशाही बस (एमएच ०९ इएम १३८२) घेऊन पुण्याकडे निघाले होते. कर्मयोगी कारखान्यांपर्यंत आल्यानंतर एक ट्रक बसला ओलांडून जात असताना बसची पाठीमागील चाके जाम झाल्याचे व धूर येऊ लागल्याचे पऊळ याच्या लक्षात आले.
त्यांनी वाहक ज्ञानोबा बबन भिसे यांनी खात्री करण्यास सांगितले. मागील चाकाचे लायनर धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर या दोघांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणात बसची पाठीमागील बाजू पेटली. प्रसंगावधान राखून चालक वाहकांनी बसचे दोन्ही बंब फोडले व ते आग विझवू लागले. तेथून जाणाऱ्या ट्रकचालकाने दोन बंब दिले. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.
या सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आली. प्रवाशांना कसली ही झळ बसली नाही. बसचे किरकोळ नुकसान झाले. इंदापूरचे आगार व्यवस्थापक मेहबूब मणेर व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.