ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - कैद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. अशाच उपक्रमाचा भाग म्हणून काही एनजीओंच्या मदतीने येरवडा कारागृहातील कैद्यांनी कारागृहाच्या भिंतींना सुंदर साज चढविला आहे.
कारागृहातील भिंतींवर विविध संतांची चित्रे काढण्यात आली असून विविध सामाजिक संदेश देत कैद्यांच्या जाणिवा जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये अनेकजण उत्तम चित्रकार आहेत. त्यांच्याकडील कलेला वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन अतिरीक्त महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेमधून करण्यात आले आहे. वानरसेना एनजीओ आणि इंडीगो पेंट्स यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या उपक्रमात कैद्यांनीही हिरीरीने भाग घेतला. कारागृहातील काळवंडलेल्या भिंतींना एक नवा साज चढवित या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. एका भिंतीवर पुस्तकात डोकावणारा मेंदू चितारण्यात आला असून या पुस्तकवृक्षाच्या फांद्या ज्ञानदीप लावत असल्याचे चित्र रंगवण्यात आलेले आहे.
यासोबतच संत तुकाराम यांचे चित्र लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. तुकारामांच्या ह्यशुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटीह्ण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही वचने रंगवण्यात आली आहेत. तसेच आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना, नारी का करो सम्मान, तभी होगा राष्ट्र महानह्ण, गालीब उम्रभर एक भूल करता रहा, धूल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा, असे सामाजिक संदेश अक्षररुपाने साकारण्यात आले आहेत. भूक आहे तेवढे खाणे म्हणजे प्रकृती, पोटापेक्षा अधिक खाणे ही विकृती, अन दुस-याला खायला देणे म्हणजे संस्कृती हा संदेश विशेष लक्षवेधी ठरत आहे. हा उपक्रम राज्यातील अन्य कारागृहांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उपाध्याय यांनी दिली.