ऑनलाइन लोकमत
अवसरी, दि. 11 - वेळ रात्री साडेनऊची... वनविभागाने लावलेल्या पिंज-यात एक बिबट्या अडकतो आणि त्याला सोडविण्यासाठी त्याचे दोन सहकारी बिबटे तीन तास पिंज-याभोवती प्रयत्न करतात. त्यावेळी ते सैरभैर होतानाचे चित्र ग्रामस्थांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. तसेच, त्यांच्या डरकाळ्यांनी अख्खे गाव भयभीत झाले.
ग्रामस्थांनी केलेली गर्दी, हातात काठ्या, उजेडासाठी बॅटरी आणि वाहनांची लाईट. यामुळे ते दोन बिबटे तब्बल तीन तास प्रयत्न करून बंदिस्त सहकारी सोडवण्यासाठी यश येत नसल्याने माघारी परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना काठापूर बुद्रुक येथे बुधवारी रात्री घडली.
काठापूर बुद्रुक गावातील भोकरवाडी वस्तीवर बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक धास्तावले आहेत. बुधवारी रात्री ९.३० वाजता शेतकरी शंकर रमाजी करंडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात एक बिबट्या अडकला. मात्र, त्याच्याबरोबर असलेले दोन बिबटे बंदिस्त झालेला आपला सहकारी बिबट्याला सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. महिन्यात हा दुसरा बिबट्या पकडला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी एक नर जातीचा बिबट्या याच ठिकाणी जेरबंद झाला होता. तर एक मादी व दोन बछडे गुंगारा देत होते. बुधवारी रात्री एक बिबट्या पकडला गेला, तर अजून दोन बिबटे या ठिकाणी असल्याने नागरिकांनी स्वत: पाहिले.
मागील वर्षभरात बिबट्या ‘आला रे ची...’ दहशत काठापूर परिसरात आहे. वर्षभरापूर्वी विहिरीत पडलेला एक नर बिबट्या वनविभागाने पकडला होता. त्यांनतर एक महिन्यापूर्वी एक नर बिबट्या पुन्हा पकडला गेला. रात्री पुन्हा एक बिबट्या पकडला गेला. असे तीन बिबटे पकडले गेले व एक मृत आढळला आहे. अजूनही दोन बिबटे या ठिकाणी आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पकडलेला बिबट्या हा नर जातीचा असून, दोन वर्षे वयाचा आहे. हा जेरबंद बिबट्या अडकल्यानंतर या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी डी. के. चेडगे, वनपाल एस. आर. खट्टे, वनरक्षक जे. बी. सानप, दत्तात्रय फापाळे व माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंंद्रात दाखल केले.
स्थानिक ग्रामस्थ लहू रोडे, शांताराम करंडे, विशाल करंडे, वनमजूर संतोष घोलप यांनी वन खात्याच्या कर्मचा-यांना मदत केली. या ठिकाणी असलेल्या दोन बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याने पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी बाबाजी करंडे आणि ग्रामस्थांनी केली आहे.