पुणे - पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता?, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि 10 ते 15 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मल्टिप्लेक्समध्ये विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दराबाबत उच्च न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. न्यायलायने निर्णय दिल्यानंतर आम्ही काही मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्नचे दर तपासले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर सिनेमातही गेले. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयाबाबत विचारलं. असता आम्हाला काही माहीत नाही आमचे वरिष्ठ याबाबत सांगतील तसच ज्यांना परवडत असेल त्यांनी यावं, असं उत्तर दिल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटल्याच शिंदे म्हणाले.
दरम्यान आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो, पॉपकॉर्नचे इतके जास्त दर का?, अशी विचारणा करत होतो. मात्र पीव्हीआरच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उर्मट आणि अरेरावीची उत्तरं दिल्याने आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि मारहाण झाल्याचं किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे. ज्या मल्टिप्लेक्समध्ये अशा पद्धतीने दर जास्त असतील तिथे निवेदन देऊन समजावून सांगणार असल्याचं आणि दर कमी केले नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.