- किरण शिंदे
पुणे : शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पुणेपोलिसांनी आणि आयुक्तांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांची पुन्हा एकदा कुंडली काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, अमली पदार्थ तस्करी प्रकरण, गाड्यांची तोडफोड यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेले, शिक्षा भोगून आलेले अशा सर्वांची पोलीस चौकी स्तरावर झाडाझडती घेण्यात आले आहेत.
पुणे शहरातील पोलिस १०९ चौकींमध्ये आज सकाळपासून गुन्हेगारांना बोलावून झाडाझडत सुरू आहे. अंदाजे एक हजाराहून अधिक गुन्हेगारांची उलट तपासणी घेतली जात आहे. तर दुसरीकडे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडूनही सराईत गुंडांना समज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात गुन्ह्यांवर चाप बसविण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, चोरी, खून यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात मुलींची छेड काढण्याचे प्रकारही शहरात घडत आहे. बऱ्याच कॉलेजच्या मुली बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे जात नाहीत. शहरातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा यामुळे पोलिसांची चिंता वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीही शहरातील प्रमुख टोळ्या आणि त्यांच्या प्रमुखांची आयुक्तांनी शाळा भरवली होती. त्यावेळीही त्यांना समज देण्यात आली होती. पण शहरातील गु्न्हेगारी संपताना दिसत नाही. यामुळे सामान्य पुणेकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. यासाठी आता पुणे पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. दिवसभरात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींना बोलावून त्यांना तंबी देण्यात आली आहे.