पुणे : राज्यात विधानपरिषद पदवीधर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी आज धावपळ पाहायला मिळाली. त्यात रुपाली पाटील यांनी पुणे पदवीधरसाठी भरलेला अर्ज बुधवारी लक्षवेधी ठरला. पाटील ठोंबरे यांनी एकप्रकारे मनसेची 'हटके' परंपरा कायम राखली आहे.
राज्यात पाच मतदारसंघात होणाऱ्या विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी भाजप,काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या अगोदर मनसेने रुपाली पाटील- ठोंबरे यांच्या रूपाने आपली महिला उमेदवार रिंगणात उतरवत प्रतिस्पर्धी पक्षांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. राज ठाकरे यांनी पाटील यांना विधानसभेच्या वेळी दिलेला शब्द पाळत पदवीधरसाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे पाटील यांनी या निवडणुकीसाठी धुमधडाक्यात तयारी सुरु केली असून प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. यात त्यांनी दोन दिवसांपूर्वी थेट सातारा गाठत खासदार उदयनराजे यांची देखील भेट घेतली.
मनसे म्हटले की निवडणुकीतील प्रचार असो वा कुठले आंदोलन ते नेहमी हटके स्टाईलने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ती परंपरा आजही पदवीधरसाठी अर्ज दाखल करताना रुपाली पाटील-ठोंबरे यांनी कायम ठेवली आहे. त्यांनी आज मनसेचे हजारो कार्यकर्त्यांसमवेत न येता एका बेरोजगार पदवीधर तरुणीसोबत विधानभवनात येत तिच्याच हस्ते आपला निवडणूक उमेदवार अर्ज देखील भरला. याद्वारे त्यांनी आपली 'हटके' स्टाईल जरी जपली असली तरी या द्वारे राजकारणात नवा पायंडा देखील पाडला आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच त्या आज चर्चेचा विषय ठरल्या.
याबाबत रुपाली पाटील म्हणाल्या, आज अर्ज दाखल करण्यासाठी मी सुद्धा मनसेचे पाच-दहा हजार कार्यकर्ते इतरांसारखे घेऊन येऊ शकले असते. पण फक्त एका पदवीधर बेरोजगार तरुणीला सोबत घेऊन तिच्याच हस्ते हा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. कारण मला केवळ आमदार होण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही तर जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावायचे आहे.
याबाबत तरुणी म्हणाली, माझ्या आई बाबांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. मी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. पण गेल्या आठ वर्षांपासून मी नोकरीसाठी प्रयत्न करतेय. मला कुठेही नोकरी मिळाली नाही. आता तरी काही मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.