पुणे : टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. अशातच वारकरी अन् पोलीस आमने सामने आले आहे. पालखीचे प्रस्थान होण्याअगोदरच हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आज माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आषाढी वारी सोहळ्याला गालबोट लागल्याचे दिसून आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले आहेत. वारकऱ्यांनीही पोलिसांना न जुमानता मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.
श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.