येरवडा: येरवड्यातील पर्णकुटी चौका जवळ बंडगार्डन पुलावरील जुनी व जीर्ण झालेली जलवाहिनी शुक्रवारी दुपारी फुटली. अचानक फुटलेल्या या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले.
येरवडा परिसरात विविध विकास कामे सुरू असल्याने जलवाहिनी फुटण्याच्या घटना कायम घडत असतात.या घटनांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जाते. आजही पर्णकुटी परिसरातील जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. नऊशे व्यासाची जुनी व जीर्ण झालेली हि जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण येरवडा परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
तसेच भामा आसखेड प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे देखील पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत करण्यात येणार असून उद्या शनिवारी नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. अचानक जलवाहिनी फुटल्यामुळे येरवडा परिसरातील नागरिकांचा पाण्याचा खोळंबा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी फुटली होती जलवाहिनी....
येरवडा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हरीगंगा सोसायटी समोर फुटलेल्या जलवाहिनीतून असेच हजारो लिटर पाणी वाया गेले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता ही जलवाहिनी फुटली रात्री बारा वाजेपर्यंत या फुटलेला जलवाहिनीतून पाणी वाहत होते. मात्र, पुण्यासारख्या शहरात अशा आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अजूनही यंत्रणा उपलब्ध नाही. दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये उधळणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांसह जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील याबाबत गंभीर नाहीत.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताना पाणीपुरवठा विभाग किंवा खाजगी कंपनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असतात. दुरुस्तीचे काम करत असताना जलवाहिनी फुटून वाया गेलेले हजारो लिटर पाणी याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नुकसान करणाऱ्या खासगी कंपन्या व त्यांचे ठेकेदार यांच्यावर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.