पुणे : एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. एमपीएसीतील वनाधिकारी परीक्षा पास होऊन ती राज्यात तिसरी आली होती. काही दिवसातच ती अधिकारी होणार होती. राज्यात तिसरी आल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीमध्ये दर्शनाचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी दर्शनाने उत्तम भाषणही केले होते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते अशी प्रतिक्रिया तिने भाषणांत दिली होती.
भाषणात दर्शना म्हणाली होती की, प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी आहे. ती ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे यशस्वी स्टोरी म्हणून येते. आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलतायेत, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. अभ्यास कसा केला पाहिजे हे विचारतात. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते असे म्हणत दर्शनाने भाषण संपवले.
दरम्यान दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तिचा मित्र राहुल हंडोरेचा अद्यापही मिळून आलेला नाही. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाला पोलिसांना नुकताच मिळाला आहे. त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे हा युवक पोलिसांच्या रडारवर आला आहे. राहुल हा सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील रहिवासी असून तो देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र दर्शनाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याच्या क्षणापासून तो बेपत्ता असल्याने पोलिसांचा मुख्य संशय त्याच्यावर आहे.