पुणे/किरण शिंदे : तीन दिवसांपूर्वींचा पुण्यातील दहशत वाजवणाऱ्या त्या गुंडांचा व्हिडिओ एव्हाना सर्वांनीच पाहिला असेल. हातात कोयता घेऊन दोघांनीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग वेठीस धरला होता. हातात कोयता घेऊन दिसेल त्या वस्तूंची, गाड्यांची, दुकानांची तोडफोड करत हे दोघे सुटले होते. त्यांचा हा रुद्रावतार पाहून नागरिकही सैरावैरा पळत सुटले होते. मात्र त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी झटक्यात या गुंडांचा माज उतरवला होता. यातील एकाची सरेआम पिटाई करण्यात आली होती. तर एक कोयताधारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. फरार झालेल्या त्या गुंडाच्या मुसक्या आता पुणेपोलिसांनी आवळल्या आहेत.
28 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत दोघेजण सहभागी होते. यातला एक अल्पवयीन होता तर दुसरा सज्ञान. करण अर्जुन दळवी 20 वर्षाचा हा आरोपी त्या घटनेनंतर मात्र फरार झाला होता. दरम्यान या गुंडांनी माजवलेल्या दहशतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुकही झाले होते. मात्र आणखी एक आरोपी फरार असल्याने पोलीस मात्र बेचैन होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेरीस तो बीड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या एका पथकाने त्याला बीड शहरात जाऊन बेड्या ठोकल्या.
अटक केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याला पुण्यात आणलं तेव्हा सर्वात आधी त्याला त्याच जागी आणलं जिथे त्याने दहशत माजवली होती. तीच वेळ, तीच जागा.. परिस्थिती मात्र वेगळी होती. दोरखंडाने हात पाठीमागे बांधलेले होते. अवतीभवती पोलिसांचा गराडा होता. अशा अवस्थेत करण दळवी याची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आली. जे नागरिक त्या दिवशी करणला पाहून सैरावैरा पळत सुटले होते तेच नागरिक आता त्याच्यावर हसत होते. ज्याप्रकारे पोलिसांनी या आरोपींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली ते पाहता इतर आरोपी असं पाऊल उचलण्यापूर्वी हजारदा विचार करतील.