बजरंग लोहार / सचिन सिंग
पुणे : नेहमीप्रमाणे मी सकाळी मोरे बिल्डिंगमधील गाड्या धूत उभा होतो. समोरच्या कम्पाउंडवरून उडी मारून बिबट्या माझ्या शेजारून समोरच्या पत्र्याच्या अडगळीच्या खोलीत पळत गेला. कम्पाउंडवरून उडी मारून येताना मला वाटले कुत्रे असले, पण जवळून जाताना माझी नजर त्याच्यावर पडली आणि मी आवाक् झालो. इतक्या जवळून बिबट्या गेला यामुळे मला धडकी भरली. मी हातातील कापड टाकून आडोश्याला गेलो आणि लागलीच साऱ्यांना ओरडून सांगितले की, समोरच्या पत्र्याच्या खोलीत बिबट्या आलाय.. बिबट्या समोरच्या पत्र्याच्या खोलीत घुसलाय..
ही घटना आहे, पुण्यातील वारजे भागातील न्यू अहिरेगावातील. आज (सोमवारी) सकाळी साडेसहा वाजता सकाळी मोरे बिल्डिंगसमोर उमेश कदम हे त्यांची कार पुसत असताना त्यांच्या अगदी शेजारून हा बिबट्या पळत गेला. त्यामुळे त्यांची भंबेरी उडाली. बिबट्या दिसल्यापासून ते बिबट्याला पकडेपर्यंत त्यांनी सांगितलेली ही पुण्यात आलेल्या बिबट्याची आजची गोष्ट.
उमेश म्हणाले की, बिबट्या दिसल्यावर मी साऱ्यांना सावध केले अनेकांनी गॅलरीतून, गच्चीवरून, खिडकीतून त्या पत्र्याच्या अडगळीच्या खोलीत पाहिले तर बिबट्या तेथे दडून बसला होता. कोणाला त्याची शेपटी दिसली तर कोणाला त्याचे कान.. अनेकांनी लांबून लांबून त्याचे व्हिडीओ काढले आणि ते काही मिनिटांत आसपासच्या साऱ्या सोसायट्यांच्या ग्रुपवर व्हायरल झाले आणि गावात एकच हलकल्लोळ माजला. काहींनी तातडीने वनविभाग व पोलिस खात्याला कळविले. तोपर्यंत बिबट्या सतीश वांजळे यांच्या शेडमध्ये जाऊन बसला. थोड्यावेळाने भूगाव येथील रेस्क्यू टीम व वन कर्मचारीदेखील त्या ठिकाणी हजर झाले. ज्या शेडमध्ये बिबट्या लपला होता त्या अडगळीच्या खोलीत कोणी जाण्यास रेस्क्यू टीमचे जवान धजावत नव्हते. वारजे येथील सर्पमित्र प्रीतम काकडे यांनी हिंमत करून त्या शेडमध्ये डोकावून पाहिले व बिबट्या त्याच खोलीत असल्याची खात्री केली. यानंतर रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी जाळी लावली. पण, पहिल्या प्रयत्नात हाती लागेल तो बिबट्या कसला. त्याने जाळीला न जुमानता तेथून धूम ठोकली व पुढे तीन-चार इमारतींना वळसा घालून त्याने येथील एका कडबा कुट्टीच्या शेडचा आसरा घेतला. यावेळी जवळ आलेल्या बिबट्याला पाहून कट्टीमधील कामगारांनी तेथून पळ काढला, तर तीन कामगारांनी तेथेच माल खाली करण्यास उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये लपून, दरवाजे, काचा बंद करून आश्रय घेतला. यानंतर रेस्क्यू टीमने त्या मोठ्या शेडच्या दाराला जाळी लावली व डाव्या बाजूने वर चढत एक पत्रा उचकटून त्यांनी भूलीच्या इंजेक्शनचा डॉट मारला. यावेळी बेशुद्ध पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने जेरबंद करीत त्याला भूगाव येथील उपचार केंद्रात पाठवले.
आज बिबट्याचा मुक्काम भूगाव केंद्रात
दोन वर्षे पूर्ण वाढ झालेला नर बिबट्याला पुढील काही दिवस भूगाव केंद्रातच निगराणीत ठेवणार असून, वनविभागाच्या सूचनेनुसार त्याला पुढे कुठे पाठवायचे हे ठरविण्यात येईल, अशी माहिती रेस्क्यू टीमचे नेहा पंचमीया यांनी दिली.
सर्पमित्रांची मोठी मदत
या मोहिमेत वारजेतील सर्पमित्रांची मोठी मदत झाली. वनविभागाचे एका हाताचे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी व अधिकारी हजर होते. त्यामुळे पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे प्रीतम काकडे, प्रतीक महामुनी, मनोज शिंदे, सागर लोखंडे, तेजस आकडे, अक्षय हेलवी यांच्यासह गणेश वांजळे यांनी इतर ग्रामस्थांसह या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
रेस्कू टीमबरोबर स्थानिक नागरिकांचा पुढाकार
बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याला पकडायला वनविभाग व रेस्क्यू टीम दीड तासानंतर आले. त्यांनी जाळी लावताना व पकडायला त्यांच्या टीमपेक्षा स्थानिक नागरिकच पुढाकार घेत होते. पहिल्याच प्रयत्नात छोट्या शेडमध्ये त्यास जेरबंद करता येणे सहज शक्य होते. सुदैवाने तो परत दुसऱ्या शेडमधील खोलीत लपला व सापडला.