पुणे : पीएमपीच्या ताफ्यात आता 25 ई- बस दाखल झाल्या असून या बसेसचा लाेकार्पण साेहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या बसेस असून यामुळे प्रदूषणात घट हाेणार आहे. तसेच या सर्व बसेस एसी असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर हाेणार आहे.
पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूकीसाठी पीएमपीकडून ई- बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत 150 बसेस खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी 25 बसेस पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण एसी असणाऱ्या या बसेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये पॅनिक बटण असून आपत्कालिन वेळी नागरिकांना त्याचा वापर करता येणार आहे. बसेसला जीपीएस यंत्रणा असून स्वयंचलित दरवाजे आहेत. त्याचबराेबर या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत. तीन तास बस चार्ज केल्यानंतर ती 200 किलाेमीटर धावू शकणार आहे. सध्या निकडी आणि भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत.