लक्ष्मण मोरे -
पुणे, दि. 07 - केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दुबई आणि लंडनमध्ये प्रेक्षकांवर गारुड घातलेल्या सैराटचे चाहतेही दिवसेंदिवस सैराट होत आहेत. पुण्यातल्या अशाच सैराट झालेल्या एका तरुणानं तब्बल 30 वेळा सैराट पाहिलाय. मुळचा करमाळा तालुक्यातील 'जेऊर'चाच असलेला या तरुणाने स्वतःची दुचाकीच सैराटमय करून टाकली आहे. तो जिथे जिथे जातो तिथे केवळ त्याच्याच दुचाकीची चर्चा सुरु होते.
स्वप्नील हनुमंत भोंडवे हा 24 वर्षीय तरुण तळजाई वसाहती आई आणि भावासोबत राहत आहे. त्याला वडील नाहीत. कॅटरिंगची कामे करून स्वप्नील धुणीभांडी करणाऱ्या आईला हातभार लावतो. घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याने रोजगारातून मिळणाऱ्या पैशांमधून दुचाकी खरेदी केली आहे. सैराट पहिल्यांदाच पाहिल्यांनंतर त्याने दुचाकीला सैराट लूक देण्याचा निर्णय घेतला. घराजवळच असलेल्या एका रेडियम दुकानदाराला त्याने मनातली कल्पना सांगितली.
या दुकानदाराने स्वप्नीलच्या मदतीने इंटरनेटवरून आर्ची परशासह नागराजची छायाचित्रे डाऊनलोड केली. त्याचे विशेष पेपर तयार करून हे पेपर दुचाकीला चिकटवले. संपूर्ण दुचाकीचा त्याने चेहरा मोहराच बदलून टाकला. त्यासाठी आईची बोलाणीही खावी लागली होती. आपली परिस्थिती नाही कशाला खर्च करतोस अशी आईची ओरड होती, पण सैराटच्या प्रेमात पडलेल्या स्वप्नीलने आपली इच्छा पूर्ण केलीच.
गेल्या आठवड्यात तो एका लग्नाला गेला असता संपूर्ण वऱ्हाड नवरानवरीला सोडून याची दुचाकी बघायला लोटले. नव दांपत्यालाही या दुचाकीवर बसून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, त्यांनीही सैराट दुचाकीवर बसून फोटो काढून घेतले. सैराटच्या या चाहत्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु असून त्याची दुचाकी कुतूहलाचा विषय ठरत आहे.