Vidhan Sabha 2019 : बारामतीत भाजपकडून पुन्हा जातीचे कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:12 PM2019-10-01T14:12:33+5:302019-10-01T14:24:43+5:30

धनगर समाजाचे फायरब्रॅँड नेते असलेल्या गोपीचंद पडळकर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणार आहेत.

Vidhan Sabha 2019 : BJP again caste card from Baramati! | Vidhan Sabha 2019 : बारामतीत भाजपकडून पुन्हा जातीचे कार्ड!

Vidhan Sabha 2019 : बारामतीत भाजपकडून पुन्हा जातीचे कार्ड!

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना तटस्थ : बारामतीच्या जातीच्या गणितात धनगर समाजाची मते लक्षणीयलोकसभा निवडणुकीत यांना पडळकर २ लाख ५८ हजार मते

बारामती : बारामतीमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील चमत्कार पुन्हा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यावेळीही जातीचे कार्ड खेळण्याची रणनीती आखली आहे. धनगर समाजाचे फायरब्रॅँड नेते असलेल्या गोपीचंद पडळकर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणार आहेत. मात्र, ही जागा आपल्या वाट्याला असून आयात  उमेदवारामुळे विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. 
महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली होती. तोच फॉर्म्युला पुन्हा वापरण्याची भाजपची खेळी आहे. बारामतीच्या जातीच्या गणितात धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर पडळकर यांनी आवाज उठविला  होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेत   सांगली लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये पडळकर यांनी सर्वाधिक २ लाख ५८ हजार मते मिळविली होती. ते विधानभेसाठी जत अथवा खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासात निवडणूक लढविणारे पडळकर हे धनगर समाजाचे पाचवे उमेदवार आहेत. यापूर्वी १९७२ मध्ये  शरद पवार यांच्याविरोधात जनता पक्षाची उमेदवारी मिळवून विजय मोरे यांनी निवडणूक लढविली होती. १९८० मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी मारुतराव चोपडे त्यांच्याविरोधात लढले होते. १९९० मध्येदेखील चोपडे यांनी पवार यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. १९९१ मध्ये अजित पवार यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढविली. यावेळी अजित पवार यांच्याविरोधात हनुमंत कोकरे यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर थेट २०१४ मध्ये  बाळासाहेब गावडे यांनी अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. रासपचे जिल्हाप्रमुख संदीप चोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की रासपचे कार्यकर्ते भाजप उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम करू. बारामतीत रासपची ताकद मोठी आहे.
...............
उमेदवार आयात करू नये
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, भाजपने उमेदवार आयात करू नये. गोपीयुतीमध्ये भाजपला बारामतीची जागा गेल्यास मित्रपक्षाचा धर्म निश्चित पाळू. मात्र, शिवसेनेकडे जागा आल्यास निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण आहे.
.........
.पडळकर यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल
पडळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान केलेल्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘‘भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे मी, माझी आई, माझे भाऊ भाजपकडून उभे राहिले तरी मतदान द्यायचे नाही. बिरोबाची शपथ आहे.’’ 

Web Title: Vidhan Sabha 2019 : BJP again caste card from Baramati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.