पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पुण्यातील काेथरुड मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या काेथरुड मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार आहेत. काेथरुड मतदारसंघामधून पाटील यांना उमेदवारी जाहीर हाेण्याची शक्यता निर्माण हाेताच आता अखिल भारतील ब्राह्मण महासंघाकडून त्यांच्या उमेदवारीला विराेध करण्यात आला आहे. प्रसंगी ब्राह्मण महासंघाने स्वतः चा उमेदवार उभा करण्याची तयारी देखील दर्शवली आहे.
युतीत शिवसेनेकडे असणारा काेथरुड मतदार संघ 2014 ला भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने भाजपाकडे गेल्या. सध्या भाजपाच्या मेधा कुलकर्णी या काेथरुडच्या आमदार आहेत. भाजपा अनेक विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यंदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यातच ते काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहेत. काेथरुड मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाजाची मते जास्त आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून त्यांना विराेध केला जात आहे.
पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपाच्या बरोबर राहिला आहे. असे असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या , दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या अशी पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार. जातीचे, आरक्षनाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर उमेदवार सुद्धा उभे करू ब्राह्मण महासंघाकडून असे ब्राह्मण महासंघाकडून सांगण्यात आले आहे.