पुणे : गेल्या दशकभरापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या पर्वती मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा डोळा होता. परंतू, रविवारी अजित पवार यांनी पुण्यातील चार मतदार संघ राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती दिली. त्यामध्ये पर्वतीचा समावेश असल्याने इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तिकीट वाटपात ' महिला ' चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत. यामध्ये शरद रणपिसे आणि माधुरी मिसाळ यांना सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मतदारांनी दिली. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदार संघामध्ये भाजपा आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा परंपरागत मतदार आहे. गेली दहा वर्षे हा मतदार संघ भाजपाकडे आहे. मोदी लाटेमध्ये २०१४ साली मोठ्या फरकाने भाजपाने पर्वतीचा हा गड राखला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम तयारी करीत होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून बागूल आणि राष्ट्रवादीकडून कदम यांनी पक्षाकडे आपण लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. आघाडी न झाल्यास २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे वेगवेगळे लढण्याची तयारीही इच्छूकांकडून केली जात होती. दरम्यान, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी झाल्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबतचे सूत्र ठरल्यावर आता केवळ औपचारिकपणे जागांच्या वाटपाची घोषणा बाकी आहे. राष्ट्रवादीला पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी मतदार संघ आले आहेत. शहर राष्ट्रवादीला याची आधीच कल्पना मिळाली होती. त्यानुसार चारही मतदार संघांच्या बैठका गुपचूप घेण्यात आल्या. रविवारी पक्षाच्या मेळाव्यात अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केल्यावर पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या पाचवर गेली आहे. यामध्ये नगरसेविका अश्विनी कदम, त्यांचे पती आणि मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, शशिकांत तापकीर, संतोष नांगरे आणि अर्चना हनमघर यांचा समावेश आहे. यामध्ये दोन ओबीसी चेहरे आहेत. पुणे जिल्ह्यामधून राष्ट्रवादीकडे केवळ पर्वती मतदार संघात महिलांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकतरी महिला उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ====सुभाष जगतापांच्या नकारामुळे मार्ग मोकळापक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून पर्वतीमधून निवडणूक लढविली होती. दोन वर्षांपुर्वी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपण पर्वती विधानसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जगताप सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदार संघामधून इच्छूक आहेत. त्यांनी पर्वतीमधून लढण्यास नकार दर्शविल्याने अन्य इच्छूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा २०१९ : ' पर्वती ' पदरात पडल्याने राष्ट्रवादीच्या इच्छूकांच्या आशा पल्लवीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 7:00 AM
पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत...
ठळक मुद्देइच्छूकांची संख्या पाचवर : ' महिला' चेहरा ठरु शकतो महत्वाचा