Vidhan Sabha 2019 : कधीच कोणाचे दिवस नसतात ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टाेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 05:38 PM2019-09-22T17:38:01+5:302019-09-22T17:46:49+5:30
पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुणे : मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अनेकांनी विविध पद्धतीने विराेध केला. जनादेश यात्रेसाठी अनेकांची धरपकड करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना कधीही दडपशाही केली नाही. महाराष्ट्र पाण्यात गेला तरीही जनादेश यात्रा थांबविण्यात आली नाही. गेल्या दाेन महिन्यात साडेतीनशे जी आर काढण्यात आले. निवडणूक आली की लाेकांना प्रलाेभने दाखविण्याचे काम सरकार करते. सत्तेची मस्ती सरकारला चढली आहे. असे म्हणत मुख्यमंत्री साहेब कधीच काेणाचे दिवस नसतात असा टाेला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पुण्यातील आण्णाभाऊ साठे रंगमंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आलेे हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.
पवार म्हणाले, शिक्षणाचा खेळ खंडोबा केल्याने शिक्षण खातं विनोद तावडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. 5 वर्ष सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजपकडून लोकसभेला करण्यात आलं. आता कलम 370 पुढे करून विधानसभेला लाेकांची दिशाभूल करण्यात येत आहे. काश्मीर मधील निवडून आलेले नेते अजूनही नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना काश्मीर मध्ये जाण्यासाठी सर्वोच न्यायालयात जावं लागलं.
पुण्याबद्दल बाेलताना पवार म्हणाले पुण्यातील सर्व धरणं भरली असली तरी पाण्यासाठी पुणेकरांना आंदोलने करावी लागत आहेत. मी 10 वर्ष पालकमंत्री असताना दुष्काळ असताना देखील पुण्याला पाणी कमी पडु दिले नाही. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.भामा असखेडच्या प्रकल्पला आम्ही मंजुरी दिले तरी त्यांना 5 वर्षात पाईपलाईन टाकता आली नाही.पुण्याचे प्रश्न एकही आमदार विधानभेत मांडताना दिसले नाही.निवडणुक आली की राम मंदिर, जात, धर्म यावर राजकारण भाजपा करते. आम्ही अनेक गोष्टी केल्या पण त्याचा गाजा वाजा केला नाही.
घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून पक्षांतर
घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून अनेकांनी पक्षांतर केले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. अनेकांच्या साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन भाजपात घेतले असल्याचे देखील पवार म्हणाले.