विधानसभा २०१९ : दोन्ही काँग्रेसला माहिती नाही ‘मित्र’ कोण..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:05 PM2019-09-24T12:05:50+5:302019-09-24T12:05:57+5:30
आघाडीचा मित्रपक्ष कोण? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना माहिती नाही
पुणे : आघाडीच्या जागावाटपामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्यात आला आहे; पण पुण्यात आघाडीचा मित्रपक्ष कोण? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना माहिती नाही. आघाडीचा पुण्यातील मित्रपक्ष कोण? हे अद्याप ठरले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले; तर पुण्यातील जागावाटपाची घोषणा प्रदेशाध्यक्ष करतील, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे स्पष्ट केले.
शहरातील आठही विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडीच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (दि.२३) काँग्रेस भवन येथे पार पडली. यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना तुपे आणि बागवे यांनी आघाडीचा शहरातील मित्रपक्ष कोण, हे अद्याप माहीत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. अजित पवार यांच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या जागावाटपाला विरोध केला. यावर बागवे यांनी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, कोणी उमेदवार दिला, तरी दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म पाळणार आहेत.
दरम्यान, याबाबत तुपे यांनी सांगितले की, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकासाठी शहर पातळीवर आणि प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच आघाडी आणि मित्रपक्ष यांचा एकत्र मेळावा घेण्यात येणार आहे, तर जागावाटपाबाबत विचारले असता, तुपे यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असून, सर्वच मतदारसंघांत पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्यादेखील अधिक आहे. यामुळे हा मतदार सोडा, हा मतदारसंघ आम्हाल द्या, अशी मागणी तर होणारच आहे; परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.
........
आबा बागुल यांची बैठकीकडे पाठ
पर्वती लढण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली; परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघावर काँगे्रसने आपला दावा सांगितला असून, येथे पक्षाचे ज्येष्ठे नेते व नगरसेवक आबा बागुल तीव्र इच्छुक आहेत. पवार यांच्या घोषणेमुळे आबा बागुल प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळेच या बैठकीकडे बागुल यांनी पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.