पुणे : येत्या १० जुलैपासून रशियात होणाऱ्या बुद्धीबळ विश्वचषक-२०२१ या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा ग्रँड मास्टर विदित गुजराथी याची निवड झाली आहे. विदितच्या सध्याच्या मानांकनावरून ही निवड करण्यात आली असून, भारतीय संघातील पी. हरिकृष्ण, पी. इनायन, अरविंद चितांबरम, बी. अधिबन, डी. गुकेश, निहाल सरिन आणि आर प्रग्गानंदा यांच्याबरोबर तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एन. श्रीनाथ यांची या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या (एआयसीएफ) वतीने महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्राचे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरिका द्रोणावली, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली आणि पद्मिनी राऊत यांचा महिला संघात समावेश असणार आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदित गुजराथी आणि अभिजित कुंटे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
ही बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा रशियातील सोची या ठिकाणी येत्या १० जुलै ते ६ ऑगस्ट २०२१ दरम्यान पार पडणार असून, तब्बल १०० देश स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत प्रत्यक्षपणे पार पडणारी ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुरुष व महिला असे दोन्ही संघ स्पर्धेत उतरले आहेत.