बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे ४५ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पुणे येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन विविध गटातील ३ पारितोषिके मिळवली.
द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आर्या चांदगुडे हिच्या शोधनिबंधास विद्यार्थी विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले. तर विभागातील संशोधक प्रा. अडसुमल्ली नीलिमादेवी यांच्या शोधनिबंधास शिक्षक विभागातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सर्वांत जास्त प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला म्हणून ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ हे पारितोषिक विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास मिळाले.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर पुणे येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन परिषदेमध्ये जगभरातील ६५२ संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र व पर्यावरणासंबंधित संशोधनावर सुमारे २०० शोधनिबंध सादर केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विभागप्रमुख नीलिमा पेंढारकर, उपप्राचार्य काशीद यांनी यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.