पुणे : राज्य सहकारी बँकेस देय असलेल्या रक्कम निश्चितीसाठीच्या समितीचे अध्यक्ष म्हणून वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, तर सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख आणि साखर आयुक्तालय सहसंचालक मंगेश तिटकारे यांची निवड केली आहे. येत्या तीन महिन्यांत या समितीने शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकीत हमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी ही समिती काम करणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकीत हमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कमेसाठी मुद्दल अधिक व्याज निश्चित करणे, तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड या बँकांना शासकीय थकहमीपोटी शासनाने देय असलेली रक्कम मुद्दल आणि व्याज निश्चित करणे, त्याचबरोबर देय असलेली रक्कम संबंधित बँकांना अदा करण्यासाठी कालावधी निश्चित करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे.