पुणे - आपल्या गच्चीवरील / ‘बाल्कनी’मधील / किंवा परसदाराची बागेची आवड जोपासताना मन लावून अनेक गोष्टी करतो. परंतु एका मुद्द्याकडे आपले नकळत थोडे दुर्लक्ष होते – ते म्हणजे परागीभवन. जर आपल्या बागेत फुलपाखरे, मधमाशा, पक्षी नसतील तर ती बाग जिवंत वाटत नाही आणि त्यांनी आपल्या बागेतील परागकण वाहून इकडे तिकडे नेले नाहीत तर भरभरून फळे, फळ-भाज्या पण येत नाहीत. म्हणून गेल्या दीड वर्षापासून डॉ. अंकुर पटवर्धन यांनी त्यांच्या घरी एक इकोसिस्टीम (परिसंस्था) उभी करायला सुरुवात केली आहे.
डॉ. पटवर्धन हे गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी प्रयत्नपूर्वक काही झाडांची जोपासना त्यांच्या बागेत केली. त्यामध्ये मधमाशा, फुलपाखरे, पक्षी यांना आवडणाऱ्या झाडे आहेत.
सोनचाफ्याची आणि आंबा, चिकूच्या झाडावरील बांडगूळाची फळे खायला ‘चष्मेवाला’, ‘फुलचुक्या’सारखे पक्षी हजेरी लावताहेत. शेवगा, भोपळावर्गीय वनस्पतीवर विविध प्रकारच्या मधमाशा, भुंगे भेट देऊन जाताहेत. चिक्कू फस्त करायला वटवाघुळे टपलेली आहेत. सहसा नकोशा वाटणाऱ्या मुंग्या परागकण इकडे तिकडे नेताहेत. त्यांच्या कोवळ्या शेंगा, फळे यावर असणाऱ्या वावरामुळे नेहमी त्रासदायक असणाऱ्या फळमाशीला जरब बसली आहे. ‘शिंपी’, ‘नर्तक’ यासारखे पक्षी घरटी करताहेत. असे सुंदर, प्रसन्न वातावरण व ही जैवविविधता घरबसल्या अनुभवता येत आहे.
———-
सुमारे ५० पेक्षा अधिक झाडांच्या प्रजाती
पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या झाडांची रोपे त्यांनी निसर्गातून फिरून बिया गोळा करून, त्यांच्या फांद्यांवर प्रयोग करून तयार केली व लागवड केली. यामुळे हळूहळू एक जिवंत परिसंस्था, अन्नसाखळ्या उभ्या राहत आहेत. दिंडा, रानमोगरा, समई, ब्लेफारीस, पेर्सिकॅरिया, तांबट, हिरवा चाफा, काळी कावळी, हरणदोडी, निळी अबोली, हिरवी अबोली, कोरांटी, निचार्डी, अंतमूळ यासारख्या सुमारे ५० पेक्षा जास्त झाडांवर झाडांवर फुलपाखरे येताहेत, प्रजनन करताहेत. त्यांना खायला ‘नमस्कार कीटक’ आहे, कोळी जाळे विणत आहेत.
———————————
गेल्या वर्षभरात सुमारे २५ पेक्षा जास्त फुलपाखरे, अनेक पक्षी, कीटक, क्वचित प्रसंगी मुंगूस असे कोणीना कुणी डॉ. पटवर्धन यांच्या परीसंस्थेला समृद्ध करत आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलू या आणि जैवविविधता जोपासायचा संकल्प करू या.
- डॉ. अंकुर पटवर्धन, विभागप्रमुख, अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभाग, गरवारे महाविद्यालय
----------------