लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : संत तुकाराम महाराजांनी जाती-धर्म भेदाच्या भिंती तोडण्याचे काम केले असून, त्यांची शिकवण प्रभावीपणे राबविण्यासाठी रमजान ईदनिमित्त संत तुकाराम महाराज संस्थानमार्फत मुस्लीम बांधवांना व वारकऱ्यांना शिरखुर्मा वाटप करून हिंदू-मुस्लीम ऐक्य होण्यास मदत मिळणार असल्याचे पालखी सोहळाप्रमुख अभिजित महाराज मोरे यांनी सांगितले.रमजान ईद देशात सर्वत्र साजरी होत असतानाच जगतगुरू तुकोबाराय पालखी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी विसावली आहे. संत तुकाराम महाराज संस्थानमार्फत मुस्लीमधर्मीय बांधवांना पालखीतळावर रमजान ईद साजरी करण्यासाठी व ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीची समाज आरती झाल्यानंतर सर्व मुस्लीम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा संस्थानमार्फत देण्यात आल्या. त्यानंतर सर्व मुस्लीम बांधव व वारकऱ्यांना शिरखुर्माचे वाटप करण्यात आले. तुकोबारायांनी ज्याप्रमाणे सर्व धर्मीयांना व सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्रित करण्याचे केलेले काम आजही अव्याहतपणे चालू असल्याची प्रचिती पालखीतळावर पाहण्यास मिळाली असून, या ठिकाणी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनही उपस्थितांना घडले होते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या आरतीनंतर नैवेद्य दाखविण्यात येतो. या वर्षी रमजान ईदच्या निमित्ताने पालखी सोहळाप्रमुख अभिजित महाराज मोरे यांनी पालखीला नैवेद्य दाखविण्याचा मान पंढरीची दरवर्षी वारी करणाऱ्या पापाभाई दगडूभाई शेख या मुस्लीम बांधवाला दिल्यानंतर पापाभाई शेख यांनी पालखीला शिरखुर्म्याचा नैवेद्य दाखवत या जगात फक्त मानवता धर्म असल्याचे सांगितले.
हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे ऐक्याचे दर्शन
By admin | Published: June 28, 2017 3:54 AM