पुणे : सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयाेजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक हाॅटेल्स आणि बारमध्ये पार्ट्या केल्या जातात. दारु पिऊन गाडी चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी अनेकजण याचे उल्लंघन करतात. गेल्या वर्षी अशा तळीरामांवर पुणे पाेलिसांनी माेठ्याप्रमाणावर कारवाई केली हाेती. यंदा देखील ड्रंक अॅण्ड ड्राईव्हवर पाेलिसांची करडी नजर असणार असून साध्या वेशातील पाेलीस देखील कायद्या माेडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई माेठ्याप्रमाणावर बाहेर पडत असते. अनेक हाॅटेल्स आणि बारमध्ये पार्ट्यांचे आयाेजन केले जाते. तरुण रात्री उशीरा मद्यप्राशन करुन वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघात देखील हाेत असतात. तसेच इतरांच्या जीवाला धाेका देखील निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे पाेलिसांकडून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांच्या विराेधात विशेष माेहीम हाती घेण्यात येते.
यंदा पुण्यात रात्री १० ते (१ जानेवारीला) सकाळी ५ वाजेपर्यंत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह च्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. १३० पेक्षा जास्त ठिकाणी स्थिर, चलित आणि साध्या वेशातील गट चाचण्या घेतील. या संपूर्ण चाचण्यांचे छायाचित्रण आणि चलचित्रण केले जाणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह चाचण्यांमध्ये दोषी ठरलेली सर्व वाहने तिथल्या तिथे जप्त किंवा ताब्यात घेतले जाणार आहेत. त्यामुळे कुणीही दारु पिऊन गाडी चालवू नये असे आवाहन पुणे पाेलिसांकडून करण्यात आले आहे.