वृद्धा ते अवघ्या ६ वर्षे वयाची बालिकाही नराधमांच्या नजरांना बळी पडतात हे फार क्रूर आहे. महिला आता समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, मोकळेपणाने बोलतात, शिक्षण घेतात. पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. कितीतरी फरक पडला आहे, पण स्त्री ही केवळ भोग्य वस्तू या दृष्टिकोनात काही फरक पडलेला नाही. अत्याचार करणारे साध्या फेरीवाल्यापासून रिक्षाचालक ते संभावीत व्हाईट कॉलर असे कोणीही असू शकतात. काही क्रूर समाजकंटक पुरुषी वर्चस्वातून हा दृष्टिकोन बाळगतात, त्यावेळी हा दृष्टिकोन ठेचला कसा जाईल यावर चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.
समाजातील संख्येने मोठ्या असलेल्या मध्यमवर्गाला खरे तर असे अत्याचार मान्य नाहीत. अशा समाजकंटकांना ते कधीही थारा देणार नाहीत, या घटना घडूच नयेत यासाठी हा वर्ग बरेच काही करू शकतो. त्याला त्या दृष्टीने सक्रिय करायला हवे असे मला वाटते. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अडचणीत आहे अशी शंका आलेल्या कोणाही महिलेला हा वर्ग विचारणा करू शकतो, मदत करू शकतो. खरे तर बस व रेल्वे स्थानके, बसथांबे, निर्जन रस्ते अशा ठिकाणी काही शंकास्पद दिसले तर पोलिस, आरटीओ, सरकारी अधिकारी या घटकांबरोबरच एखाद्या मध्यमवर्गीय नागरिकानेही तेवढेच सतर्क रहायला हवे. त्यामुळे घटना घडण्याआधीच त्याला आळा बसू शकतो.
अशा घटनांमधील पीडित महिलांचे मनोबल वाढवण्याचाही एक मोठा विषय आहे. कायदा पूर्णपणे महिलांच्या बाजूचा आहे. साक्षीदार संरक्षण कायद्यासारखा महत्वाचा कायदा आहे. त्याशिवाय आणखी एका कायद्याविषयी मला सांगायला हवे. राज्य सरकारने शक्ती नावाचा एक कायदा प्रस्तावित केला आहे. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात त्याला मंजुरी मिळेल. गुन्ह्याची उकल त्वरित होऊन आरोपींना कठोर शिक्षेच्या तरतुदीबरोबरच पीडितेच्या पुनर्वसनाचा विचार यात केला आहे.
अशी सकारात्मकता समाजानेही दाखवायला हवी. ती नाही असे म्हणता येणार नाही. समाजात आजही सकारात्मक विचार करणारे, सहृदयी पुरूष आहेत,पण ते प्रमाण फार कमी आहे. अगदीच नगण्य म्हणता येईल असे. एकूण समाजानेच पीडितेला बळ द्यायला हवे, तिला सन्मान, प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घ्यायला हवी.
समाजाची म्हणून इतकीच जबाबदारी आहे असे नाही. आरोपींना वेगळे पाडणे,त्याचबरोबर अशा प्रवृत्तीचे कोणी दिसले, तर त्यांनाही वेगळे पाडणे असे झाले, तर आपोआपच या नराधम वृत्तीला वचक बसेल. अशा वेळी आवश्यकता असेल तर समविचारी असलेल्या आणखी काही जणांची मदत घेता येईल. सरकारी यंत्रणांना सावध करता येईल. यातही कायद्याची साथ आहे हे मला सांगावेसे वाटते.
दृष्टप्रवृत्ती उघडपणे दिसत नाहीत, पण त्याची चाहूल नक्कीच लागते. त्यावेळीच सतर्क होणे गरजेचे असते. सरकारी यंत्रणा आणि समाजासाठीही ही सतर्कता महत्वाची आहे, असे माझे मत आहे. वानवडीतील प्रकारात एका कार्यालयात घटना घडल्याचे पुढे येत आहे. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवे. पाहूनही काही दखल घेतली नाही अशांनाही यात जबाबदार धरायला हवे. त्यांनी सतर्कता दाखवली असती, तर कदाचित पुढचे अत्याचार घडलेही नसते. म्हणून समाजानेच अशा सतर्कतेची सवय लावून घ्यायला हवी.
महिलांची सुरक्षा हा फक्त महिलांचा प्रश्न आहे, अशा संकुचित दृष्टीने त्याकडे पाहणे योग्य नाही. हा एकूणच समाजाचा, सामाजिक सुरक्षेचा, समाजाच्या विवेक, विचारशक्तीचा प्रश्न आहे. आपला भोवताल आपल्यालाच, आपल्यासाठी सुरक्षित करायचा आहे हे प्रत्येक सुजाण नागरिकाने लक्षात घ्यायला हवे. विघ्नहर्त्या श्री गजाननानेच आता समाजाला सतर्क, सावध राहण्याची बुद्धी देवो व नराधम प्रवृत्तींचा नायनाट होवो हीच माझी गणेशचरणी प्रार्थना.
-- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद