लोणी कंद : विजय रणस्तंभ परिसरात रविवारी राज्यभरातून आलेल्या दलित बांधवांचा महासागर लोटला होता. पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे नेते, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते, भीमसैनिक, आंबेडकर बांधव यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. दलित नेत्यांच्या अभिवादन सभा, भीमगीत गायनाचा कार्यक्रम, बुद्धवंदना, सामुदायिक सलामी अशा भरगच्च कार्यक्रमाने परिसर व्यापून गेला होता.एक जानेवारी १८१८ रोजी पेशवाई आणि ब्रिटिश यांचे घनघोर युद्ध भीमा नदीतीरावर झाले. यामध्ये महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावली आणि इंग्रज विजयी झाले. याप्रीत्यर्थ १८२२ मध्ये या विजयाचे प्रतीक म्हणून विजय रणस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर या स्थळाला भेट दिली आणि तमाम दलित बांधवांचे इकडे लक्ष वेधले गेले. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक मानवंदना देण्यासाठी येतात. रविवारी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले, राज्य समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा मीराताई आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार अमर साबळे, भीमराव आंबेडकर, महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, राजाभाऊ सरोदे आदींनी स्वतंत्र भेट देऊन मानवंदना दिली.सकाळी बुद्धवंदना देण्यात आली. त्यानंतर दलित बांधवांच्या वतीने सामुदायिक मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच स्वतंत्र साऊंड सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. समता सैनिक दलाच्या वतीने शेकडो जवानांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. विविध पक्ष, संघटना यांच्या वतीने अभिवादन सभा झाल्या. पहाटेपासूनच पुणे-नगर रस्ता गर्दीने वाहू लागला होता. टेम्पो, ट्रक, शहर बस, एसटी मिळेल त्या वाहनाने दलित बांधव विजय रणस्तंभाकडे धाव घेत होते. सकाळी १० वाजता सर्व परिसर गर्दीने फुलून गेला होता. (वार्ताहर)
विजय रणस्तंभास लोटला भीमसागर
By admin | Published: January 02, 2017 2:12 AM