Vijay Shivtare ( Marathi News ) : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असल्याचं सांगत आज थेट निवडणूक अर्ज भरण्याची तारीखही जाहीर केली आहे. "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
"पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे. हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत. मी दोन्ही पवारांविषयी माझ्या सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवारांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. सुप्रिया सुळेंनीही मागील १५ वर्षांत लोकांच्या हिताचं दोन टक्केही काम केलं नाही," असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला आहे.
विजय शिवतारेंनी सांगितली निवडणूक रणनीती:
- १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार.
- माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता उपस्थित राहणार नाही. माझ्यासोबत फक्त जनसामान्य दिसतील.
- माझी ओळखपत्रं गावा-गावात वाटली जातील.
- १ एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर पाच विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या जातील. या सभांमध्ये त्या त्या भागातील प्रश्न मांडले जातील.
- १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
- मला निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवले जाईल.
- ४ जूनला जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात ते सर्वांसमोर येईल.