मुंबई/पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दोन दिवस सबुरीचे धोरण बाळगणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, ते दौड मतदारसंघातील दौऱ्यावर जात असतानाच त्यांना पुण्यातून बोलवण आल्यामुळे ते पुण्याकडे परत फिरले. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारेंची भेट घेऊन चर्चा केली.
मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. याबाबत स्पष्टीकरण देताना, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबणं ही बातमी नाही, माझी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा झाली आहे. त्यानुसार, मी दोन दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे, काय असेल ते पुढे पाहता येईल, असेही शिवतारेंनी म्हटले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर व खासदार राहुल शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन शिवतारेंची भेट घेतली. या भेटीत बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून शिवतारेंची समजूत घालण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवतारेंची भूमिका काय असेल हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. दरम्यान, शिवातरेंना किडनीचा त्रास असल्याने त्यांना डायलिसीस करावं, लागतं. ते डायलिसीस करण्यासाठी रुबी हॉस्पीटलमध्ये गेले होते. त्यावेळी, रुग्णालयात जाऊन मंत्री केसरकर यांनी बंद दाराआड त्यांच्यासमवेत चर्चा केली.
दरम्यान, विजय शिवतारे हे दौंडच्या दौऱ्यावरती होते परंतु दौरा मध्येच सोडून विजय शिवतारे पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन एक मंत्री आले असल्याची बातमी आली त्यामुळे विजय शिवतारे यांना संध्याकाळी हा दौरा अर्धवट सोडून पुण्याला जावं लागलं. रात्री उशिरा केसरकर आणि शेवाळे यांनी विजय शिवतारे यांचे रुग्णालयात भेट घेतली.