पुणे : पोर्शे अपघात प्रकरण दडपण्यामागे बडा राजकीय हात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुणेकर, नागपूरकर किंवा बारामतीकर कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नाही, सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीच करावी अशी मागणी करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
पुणे बचाव संस्थेच्या कार्यक्रमासाठी वडेट्टीवार पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता असे सांगितले. ते म्हणाले, “काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर तिथे लगेच गेले नसते तर स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण दडपलेच असते. स्थानिक पोलिस हे धाडस करू शकले याचे कारण त्यामागे कोणीतरी बडा राजकीय हात आहे. बिल्डर पुत्राला वाचवण्याचा शब्द त्याने दिला असावा. बड्या बापाचे सगळे फोन रेकॉर्ड पोलिसांनी तपासले पाहिजे. आमदार सुनिल टिंगरे तिथे का गेले होते? त्यांनी काय केले? त्यांना कोणाचा फोन आला? त्यांनी पोलिसांनी काय सांगितले? या सर्व गोष्टी उघड व्हायला हव्यात. आवश्यकता वाटल्यास आमदार टिंगरे यांना ताब्यात घेऊन त्यांचीही चौकशी करावी, त्यांचे फोन रेकॉर्ड तपासावे.”
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
ससूनमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तचाचणी अहवाल बदलल्याचे निदर्शनास आले. एकाच गुन्ह्याचे दोन एफआयआर होणे हा गंभीर प्रकार आहे. आधी एक कलम नंतर एक कलम असे कसे झाले? गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलिस आयुक्तांना नक्की काय सांगितले? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. पोलिस आयुक्तच काय, सरकारच बदलण्याची वेळ आली आहे. हे सरकार नक्की कोणासाठी काम करत आहे? असा प्रश्न राज्यातील अनेक प्रकरणांवरून दिसून येत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.