लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांना शेतीमाल विक्रीसाठी शहरात मोक्याच्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी "विकेल ते पिकेल" अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे शंभर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात येणार असून, जागा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही महापालिकेशी चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने " विकेल ते पिकेल " अभियानांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार अधिनस्त कृषि व संलग्न विभागामार्फत जिल्हयात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, जिल्ह्यातील शेतकरी गटांना शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या मार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेशी समन्वय साधून या जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बोटे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 48 ठिकाणी जाग देण्याची तयारी दर्शविली असल्याचे बोटे यांनी सांगितले.
-----
नाममात्र शंभर रूपये घेऊन जागा देणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेकडून नाममात्र शंभर रुपये शुल्क भरून या जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये शेतीमालाची विक्री झाल्यानंतर जागेची स्वच्छता करण्याची जबाबदारी शेतक-यांवर टाकण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक