पुणे : शहरातील सर्वांत महागडा रस्ता ठरलेल्या सातारा रस्त्यावर बहुधा खर्चाचा नवा ‘विक्रम’ रचला जाणार आहे. या रस्त्याच्या पुनर्विकासासाठी १०८ कोटी रुपये खर्च करूनही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणखी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पदपथ, बसथांब्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या खर्चाला स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पहिल्याच बैठकीमध्ये मंजुरी दिली.स्वारगेटपासून कात्रजपर्यंत जाणारा सहा किलोमीटरचा हा रस्ता निर्दोष होणार तरी कधी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर यापूर्वी प्रतिकिलोमीटर १८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण राहिलेले आहे. याबाबत सातारा रस्त्यावरील नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये या कामाच्या चौकशीची मागणी केली होती. त्याचा अहवाल सभेला सादर करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप हा अहवाल आलेला नाही. या रस्त्यावरील खर्चावरून गदारोळ सुरू असतानाच आणखी २२ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या रस्त्यावर पदपथ आणि सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. यासोबतच नवीन बसथांब्यांचेही काम केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौक ते कात्रजपर्यंतच्या पाच किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गावर १०८ कोटींचा खर्च झालेला आहे. या रस्त्यावरील काम वाढल्याचे कारण देत आणखी ३० कोटींच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरूहोत्या. मात्र, ठेकेदाराच्या नेमणुकीवरून झालेल्या वादामुळे ही प्रक्रिया रखडली.या रस्त्याच्या कामात राहिलेल्या त्रुटी, अपूर्ण आणि निकृष्ट कामे, नगरसेवकांनी घेतलेली आक्रमक भूमिका याकडे दुर्लक्ष करीत आणखी २२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
सातारा रस्त्यावर खर्चाचा रचला जाणार ‘विक्रम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 1:08 AM