लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागे उभा मंगेश...भिनी भिनी भोर भोर... ये राते ये मौसम... सलोना साजन है... चोके नामे बिश्ती... तरुण आहे रात्र अजूनी अशा एकाहून एक सरस मराठी, हिंदी आणि बंगाली गाण्यांनी सलग रसिकांना दिवस सुरेल केला. निमित्त होते ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या पंचाहत्तरीनिमित्त गायिका मंजुश्री ओक यांनी सादर केलेल्या ‘ज्वेल्स आॅफ आशा भोसले’ या मैफलीचे. सलग बारा तास १२१ गाणी सादर करून ओक यांनी आशातार्इंना अनोखी मानवंदना दिली.यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर मुक्ता टिळक, सॅक्सोफोनवादक इनॉक डॅनियल, विवेक परांजपे, पं. सुहास व्यास आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सांगीतिक मैफलीचा श्रीगणेशा झाला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेली भक्तिगीते, भावगीते, लावणी, नाट्यगीते, पॉप, कॅब्रे असे वैविध्यपूर्ण गायन सादर करत मंजुश्री ओक यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. विविध रसांनी नटलेली, सजलेली आणि आशातार्इंचे अष्टपैलूत्व दर्शवणारी सर्व प्रकारची गाणी या कार्यक्रमात मंजुश्री ओक यांनी सादर केली. लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक आॅफ रेकॉडर््स यामध्ये आशा भोसले यांच्या गाण्यांच्या सलग सादरीकरणाचे एखाद्या गायिकेने केलेला हा पहिलाच विक्रम या निमित्ताने नोंदवला गेला. या स्वरसोहळ््याचे थेट प्रक्षेपण श्रीयशलक्ष्मी आर्ट संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, मंजुश्री ओक यांच्या या कलासादरीकरणातून मातृभूमीची सेवा करताना अपंगत्व आलेल्या वीर दिव्यांग जवानांसाठी कार्यरत असलेल्या खडकी येथील क्विन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेला आणि पीडित शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या आपुलकी या संस्थेला आर्थिक मदतीचा हात दिला गेला.संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, चांगले गायन रसिकांपर्यंत पोहोचावे, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे. १२१ गाण्यांच्या सादरीकरणातून आशातार्इंना अनोखी मानवंदना देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आत्मक्लेश, नैराश्य दूर करुन संगीत मनाला शांतता प्रदान करण्याचे काम करते. संगीताची जादू अनोखी आहे, यात शंका नाही.- मंजुश्री ओकआशातार्इंच्या गाण्यांचे सलग १२ तास सादरीकरणाचा उपक्रम पुण्यात पहिल्यांदाच होत असल्याचा खूप आनंद होत आहे. महिलेने केलेला हा पहिलाच सुरेल प्रयोग आहे. यानिमित्ताने आशातार्इंच्या अजरामर गाण्यांना नव्याने उजाळा मिळाला आहे. मंजुश्री ओक यांच्या हातून असेच वैविध्यपूर्ण प्रयोग होत राहोत, अशी खात्री वाटते.- मुक्ता टिळकया कार्यक्रमात २५ वादक कलाकार, १५ सहगायक, ९ निवेदक, कोरस यांनी सहभाग नोंदवला. उडत्या चालीच्या गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला, तर जुन्या हिंदी चित्रपटांमधील रोमँटिक गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ये रे घना, रंग दे मुझे रंग दे, चुरा लिया है, तुमसे मिलके या रावजी, हाल कैसा हे जनाब का, आओ हुजूर तुमको, नैना तोसे लागे आदी गाण्यांनी रसिकांवर मोहिनी केली.
मंजुश्री ओक यांचा विक्रमी स्वरयज्ञ
By admin | Published: July 06, 2017 3:52 AM