बाणेर : भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोल-ताशांच्या निनादात श्री भैरवनाथाची यात्रा परंपरागत पद्धतीने उत्साहात पार पडली. बाणेर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती होती. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार डॉ. दिलीप मुरकुटे व उपाध्यक्ष लक्ष्मण सायकर यांनी दिली. ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी शहर व परिसरातून असंख्य भाविक आले होते. यात्रेत वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, वीजसेवा, अग्निशामक आदी व्यवस्था ठेवण्यात आली होती.यानिमित्ताने बाणेर गावातील महापालिकेच्या सोपानराव कटके प्राथमिक शाळेच्या आवारात सायंकाळी ६ ते रात्री ९च्या दरम्यान कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. बाणेर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात चांदीची गदा व एक लाख रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती विलास डोईफोडे याने ज्ञानेश्वर बोचडे याला चितपट करून जिंकली. तृतीय क्रमांकाच्या ५१ हजार रुपये इनामाच्या कुस्तीत गोकुळ आवारे याने गोपीनाथ घोडके याला पराभूत केले. ८४ किलो गटात अत्यंत प्रेक्षणीय लढतीत ७५ हजार रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती अण्णा जगताप याने हनुमंत शिंदे याला चितपट करून जिंकली, तर तृतीय क्रमांकाच्या ३५ हजार रुपये इनामाच्या कुस्तीत सत्पाल सोनटक्के याने अक्षय कावरे याला पराभूत केले. डॉ. दिलीप मुरकुटे, लक्ष्मण सायकर, सागर ताम्हाणे, दत्तात्रय गायकवाड, अमोल बालवडकर, गुलाबराव तापकीर, बबनराव चाकणकर, संजय ताम्हाणे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश मुरकुटे, कृष्णा गांधिले, आशिष ताम्हाणे, अनिकेत मुरकुटे, राहुल पारखे, संदीप वाडकर, गहिनीनाथ कळमकर, जयसिंग मुरकुटे, बाळासाहेब सायकर, शंकर ननवरे, नितीन रनवरे, बन्सीलाल मुरकुटे, अंकुश धनकुडे, रामदास विधाते, विजय विधाते, भगवंत भुजबळ उपस्थित होते. (वार्ताहर)शिस्तबद्ध दर्शनासाठी ट्रस्टतर्फे नियोजनभाविकांना शिस्तबद्ध दर्शन घेता येण्यासाठी मंदिर परिसरात सुयोग्य नियोजन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले होते. त्यामुळे भक्तांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागले नाही. या उपाय योजनेमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
विलास डोईफोडेला बाणेर चषक
By admin | Published: May 01, 2017 3:06 AM