- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.आगामी साहित्यसंमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केले होते. साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती; मात्र गेल्या अडीच महिन्यांत अशा स्वरूपाचे कोणतेही निमंत्रण साहित्य महामंडळाकडे आलेले नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. मुळात साहित्य संमेलनाचे निमंत्रण शासन देऊ शकते का, आणि असे निमंत्रण आले तर संमेलन शासनाच्या हाती सुपूर्द करावे का, हे मुद्दे यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनासाठी भिलार येथून अद्याप निमंत्रण आलेले नाही.साहित्य महामंडळाची बैठक जूनमध्ये होणार आहे. त्यामध्ये स्थळांबाबत चर्चा होईल, असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.आगामी संमेलन विदर्भातसाहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडे गेले, त्याला दोन वर्षे झाली आहेत. यापूर्वी डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलन झाले असल्याने महामंडळाच्या कार्यकाळातील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्यरसिकांची अपेक्षा आहे.आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पुस्तकाच्या गावी संमेलन अनिश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 4:04 AM