मार्गासनी: येथे ग्राम न्यायालय उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिले होेते. मात्र, शासकीय काम अन् दहा महिने थांब या उक्तीप्रमाणे हा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला आहे. वर्ष-दीड वर्ष होत आले, तरी ग्राम न्यायलयाचे काम पुढे काही सरकेनासे झाले आहे. दरम्यान, निधीअभावी हे काम रखडल्याचे समोर आले असून वेल्ह्यात न्यायालय सुरु करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड राजधानी म्हणून केली
होती.या ठिकाणी २७ वर्षे स्वराज्याचा राज्यकारभार केला होता.राजगडावर स्वराज्यातील न्याय-निवाडा केला जात होता.देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनदेखील वेल्ह्यास ग्राम न्यायालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून, अठरा गाव मावळ, बारा गाव मावळ, गुंजन मावळ
आदी परिसरात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाहीत, वेल्हेतील नागरिकांना न्यायासाठी पुणे येथील
जिल्हा न्यायालयात जावे लागत आहे. पुणे ते वेल्हे अंतर ६० किलोमीटर आहे.तसेच अठरा गाव मावळ परिसरातून ८० ते १०० किलोमीटर अंतर जावे लागत असून वेळ आणि आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात
होत आहे.स्वारगेट व भोर आगाराच्या मर्यादित फे-या वेल्ह्यात होत असल्याने केळद,पासली,घोल,चांदर,
वाजेघर,पाल,दादवडी आदी परिसरात दिवसभरातून एकदाच एसटी येत असते त्यामुळे पुणे येथील न्यायालयात
जाण्यासाठी सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.उच्च न्यायालयाने दि ९ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाला ग्राम न्यायालयासाठी आर्थिक तरतूद,पदनिर्मिती आणि अधिसूचना काढण्यासाठी लेखी स्वरुपात कळविले होते. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील वित्त विभागातून आजपर्यंत वेल्ह्यातील ग्राम न्यायालयासाठीची फाईल धूळखात पडली आहे.तर वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.वेल्ह्यात ग्राम न्यायालय कधी सुरू होणार, याकडे वेल्हेकरांचे लक्ष लागले आहे.
केळद ते पुणे हे अंतर ८० ते ९० किलोमीटर असून पुणे येथे न्यायालयाच्या कामासाठी जाण्यासाठी
सकाळी एकच एसटी असून तीच गाडी सायंकाळी ६ वाजता केळदला येते.न्यायालयाच्या कामासाठी वेळेवर गाडी नसल्याने अडचणी
येतात. वेल्ह्यात ग्राम न्यायालय होणे गरजेचे आहे
रमेश शिंदे केळद (ता.वेल्हे)
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेल्हे ग्राम न्यायालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृहामधील हॅाल क्रंमाक २ तोरणा मिळाले असून महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या शनिवारी वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरु केले जाणार आहे. मात्र, तालुक्यातील ग्राम न्यायालय निधी अभावी रखडले आहे. १० फेब्रवारी रोजी ग्राम न्यायालयाच्या स्वतंत्र जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
विजय झांजे, अध्यक्ष, बेल्हे बार असोसिएशन