-अविनाश हुंबरे
सांगवी (बारामती): दूरवर असणारे गाव व पोलीस ठाणे अशातच रात्री-बेरात्री एखाद्या वाडी-वस्तीवरच्या घरावर अचानकपणे पडणारा दरोडा अथवा एखादा आपत्कालीन प्रसंग रोखण्यासाठी होणारा विलंब, अशा वेळी लोकांच्या मनात असुरक्षितता माजलेली असते. मात्र, या दुर्घटना व दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी गावातील लोकांकडूनच तातडीची मदत मिळवण्यासाठी गावागावात एक प्रभावी माध्यम कार्यान्वित करण्यात आलं. ते म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणा, मोबाईलवरून फक्त एक फोन केला की वायरलेसद्वारे सर्व घटनेची माहिती मिळताच अख्खा गाव जागं करणारी ही यंत्रणा मात्र, बारामती सारख्या ठिकाणी अंमलबजावणी वाचून थंडावली आहे.
यामुळे तालुक्यात दुर्घटना, चोऱ्या, दरोडे, शॉर्टसर्किटने उस जळून खाक होणे, अशा घटना वाढू लागल्या आहेत. एखाद्या घटनेला दुर्घटनेत रूपांतर न होऊ देता दरोडे, चोऱ्या, दुर्घटना, उसाला आग लागणे, सर्प दंश, नदीत कोणी बुडणे, अपघात, महिला छेडछाड, गुन्हे, अशा एक ना अनेक आपत्कालीन घटना रोखण्यासाठी व घटनाग्रस्ताला गावातील नागरिक, पोलिस यांना एकाच वेळी सतर्क करून मदत कार्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, सध्या बारामतीत ही यंत्रणा झोपली आहे. यामुळे चोऱ्या, दरोडे यांसारखे प्रमाण वाढले आहे. गावागावात एकदा बैठक घेतल्यानंतर पुन्हा प्रात्यक्षिक बैठका झाल्याच नाहीत. सध्या गावागावात यंत्रणेत सर्व कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल क्रमांक समाविष्ट झाले असले तरी अनेकांना या यंत्रणेविषयक प्रात्यक्षिके पाहायला न मिळाल्याने ही यंत्रणा अंधारातच आहे.
दुर्घटना अथवा चोरी, दरोडे यासाठी मदत कार्य मिळण्यासाठी गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक मोबाईल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी १८००२७०३६०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास एकाच वेळी संबधीत पोलीस ठाण्यासह हजारो क्रमांकावर संपर्क करण्याची यंत्रणा जोडली आहे. काेणत्याही कुटुंबातील कोणताही सदस्य संकटात असेल तर त्याला या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळणे सोयीचे व्हावे, हा या यंत्रणेचा हेतू आहे.
सुरुवातीच्या काळात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे बारामती तालुक्यात चोरी होण्यापासून अनेक घटना रोखल्या गेल्या. मात्र, सध्या बारामती तालुक्यात याचा प्रभावी वापर होताना दिसत नाही. यामुळे चोरीच्या घटनांत वाढ झाली. एक वर्षा पूर्वी दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून बारामतीत सर्व पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन या यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवून यंत्रणेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक गावात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली होती. त्यानंतर विशेष अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपलेली जबाबदारी झटकल्याचे चित्र समोर आले
संकटकाळी दुर्दैवी घटना रोखण्यासाठी व परिसरात जलदगतीने दुर्घटना, दरोडे, चोऱ्या अशा घटनांना वेळीच आळा बसण्यासाठी तालुक्यात ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना योग्य प्रशिक्षण देऊन ग्राम सुरक्षा यंत्रणे विषयक तालुक्यात जागृता केली जाणार आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वीडियो क्लिप व मेसेजद्वारे लोकांच्यात जनजागृती करून ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरा संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. -गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती)