विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी
शिक्षक संघाने केली मागणी
शिक्षक संघाची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
बारामती : कोरोना रुग्ण नसलेल्या गावात नियमित शाळा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे (कै. शिवाजीराव पाटील गट) सरचिटणीस केशवराव जाधव यांनी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट)यांच्या वतीने केली आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.
कोरोनामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले. विविध कारणांमुळे परंतु अपेक्षित प्रभाव साधता आला नाही. यावर्षी शासनाने १ जुलैपासून सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) सुरू केला आहे. त्याअंतर्गत १ जुलै ते १५ ऑगस्टअखेर विद्यार्थ्यांना सलग ४५ दिवस मागील इयत्तेचा अभ्यास शिकविला जाणार आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी शिकविलेल्या भागावर चाचणी घ्यावयची आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या घरी जाऊन गट करून त्यांना कृतिपत्रिका, स्वाध्यायपुस्तिका यांच्या माध्यमातून शिकवावे असे अपेक्षित आहे. परंतु सदर उपक्रमाची अंमलबजावणी करणे जिकीरीचे ठरत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने कोणतेही अनुदान दिलेले नाही. यासाठी होणारा सर्व खर्च शिक्षकांनी स्वत: करायचा आहे. तो सर्व आर्थिक भार शिक्षक सोसायला तयार आहेत. परंतु अनेक गावांत विद्यार्थी वेगवेगळ्या वाड्या-वस्त्यांवर विखुरले आहेत. तसेच अनेक ठिकाणी बैठक व्यवस्थेची अडचण आहे. विशेषत: महिला व दिव्यांग शिक्षकांच्या दृष्टीने सदरची कार्यवाही गैरसोयीची ठरत आहे.
यासर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी कोरोना रुग्ण नसलेल्या गावात शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीने शाळा दररोज दुपारी ११ ते १ वेळेत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचेशी संपर्क साधण्यात आला होता. कोरोना रुग्ण नसलेल्या गावात शाळा सुरु करणेबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. जिल्हा परिषदेच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा असल्याचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड यांनी सांगितले.
——————————————
सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्याचे मागील वर्षी झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास तो साहाय्यभूत ठरणार आहे.सदर उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष शाळेत अधिक प्रभावी ठरेल.
केशवराव जाधव सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट).
————————————————
वाडी-वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष अध्यापन करणे दिव्यांग शिक्षकांच्या दृष्टीने त्रासाचं व गैरसोयीचे आहे. त्याऐवजी कोरोना रुग्ण नसलेल्या गावात प्रत्यक्ष शाळा भरवावी.
केशवराव आगवणे-अध्यक्ष, पुणे जिल्हा अपंग कर्मचारी संघटना.
——————————————————
महिला शिक्षकांनी आॅनलाईन शिक्षणाचे काम अत्यंत प्रभावी व प्रामाणिकपणे केले आहे. परंतु गृहभेटीचा उपक्रम त्यांच्यासाठी गैरसोयीचा ठरत आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष शालेय परिसरात अध्यापन करणे सोयीचे ठरेल.
गीता बालगुडे-अध्यक्षा, बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) महिला आघाडी.