भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते. मात्र तिच्या बहुतांश कार्यक्रमात चाहत्यांचा गोंधळ, वाद होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी गावच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला 'गौतमी पाटील शो' गोंधळाविना पार पडला. परिणामी मोहितेवाडीतील ग्रामस्थांनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागात यात्रा सुरू झाल्या आहेत. अनेक गावातील यात्रा - जत्रांमध्ये सांस्कृतिक नाच - गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. विशेषतः लोकनाट्य तमाशा, भारुड, आर्केस्ट्रा आयोजित करण्यावर भर आहे. मात्र सद्यस्थितीत गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला फार मोठी पसंती दिली जात आहे. गावची यात्रा म्हटलं की, गावात गौतमीला आणायचंचं असा सूर ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे. दरम्यान गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि तिच्या कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला यापूर्वी प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.
दरम्यान मोहितेवाडीतील कार्यक्रमात तरुणांसह गावातल्या तरुणींनी देखील ठेका धरला. विशेष म्हणजे तिच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. गौतमी पाटीलच्या आदाकारीला दाद देत तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकली मुलं यांनी मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमात हजेरी लावली.